मराठीतील ज्ञानपीठकार
1. वि. स. खांडेकर
वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. [संदर्भ हवा ]
खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.
2. कवि कुसुमाग्रज
(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नासिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नासिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नासिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. कुसुमाग्रज जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.
3. विंदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षकहोते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
४ . भालचंद्र नेमाडे
भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म: २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत. भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.